लेणी:महत्वाची ऐतिहासिक वास्तू

ऐतिहासिक वास्तू या पुरातत्त्व संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या काळाच्या साक्षीदार असलेल्या या वास्तू आपल्यासमोर तो ऐतिहासिक काळ उलगडून दाखवतात. महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची अनमोल ठेवा आहे. एखाद्या गडावर गेल्यावर आजही मराठी मावळ्यांचा पराक्रम आठवून ऊर अभिमानाने भरून येतो. किल्ल्यांप्रमाणेच अजून एक महत्वाची वास्तू म्हणजे लेण्या.लेण्या त्या त्या काळातील सामाजिक,आर्थिक,राजकीय ,सांस्कृतिक स्थितीचे संदर्भ आपल्यापर्यत पोहचवतात. ‘लेणी’  म्हणजे डोंगर, टेकडी पर्वत, खडक कोरून तयार केलेली गुहा. संपूर्ण भारतात मिळून एकूण १२०० च्या आसपास लेण्या आहेत. त्यापैकी जवळपास ८०० लेण्या या फक्त महाराष्ट्रात आढळतात. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील अग्निजन्य खहक हा अशा प्रकारच्या कोरीव कामासाठी अनुकूल होता. हा खडक मध्यम कठोर असून  यावर कोरीव काम करणे सहज शक्य होते. घारापुरी, कान्हेरी, महाकाली अशा अनेक लेण्या महाराष्ट्रात आहेत. अजिंठा-वेरूळ लेणी बघण्यासाठी तर परदेशी पर्यटकसुद्धा गर्दी करतात.

या लेण्यांचे  एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या धार्मिक वास्तू आहेत. सर्वात जास्त गुहा बौद्ध धर्मियांसाठी केलेल्या आहेत. विविध धर्मांच्या आश्रयदात्यांनी त्या कोरण्यासाठी सढळ हातांनी दानधर्म केला.  या लेण्या घडवण्यासाठी  बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या राजांकडून ही भरघोस मदत घेतली जायची. आतापर्यंतच्या संशोधनानुसार महाराष्ट्रात लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व पहिले -दुसरे शतका पर्यंत मागे नक्कीच  खेचता येईल. भाजे, कार्ले, बेडसे या लेण्या या अगदी सुरवातीच्या काळात कोरण्यातआल्या असे संशोधकांचे मत आहे. सम्राट अशोकाने अंदाजे तिसऱ्या शतकात बिहार येथे बांधलेल्या लोमसऋषि लेणीचा महाराष्ट्रातील लेण्यांच्या घडणीत प्रभाव दिसून येतो.

हिनायन आणि महायन अशा दोन कालखंडात या लेण्यांचे प्रकार प्रामुख्याने विभागले जातात. बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील हीनयान पंथामध्ये बुद्धाचे मानवी रूप गृहित धरले होते. त्यामुळे त्यांना मूर्तिपूजा अमान्य होती. त्यांच्या कलाविष्कारामध्ये बुद्धाच्या प्रतीकांना  महत्त्व होते. बुद्धाच्या जीवनातील चार प्रमुख घटना चार प्रतीकांच्या द्वारे दर्शविल्या जात. जन्माचे प्रतीक हत्ती (श्वेत गज), ज्ञानाचे प्रतीक पिंपळवृक्ष (बोधिवृक्ष), उपदेशाचे प्रतीक चक्र(धर्मचक्र), तर बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक स्तूप, अशा रीतीने हीनयान पंथाची कला दिसून येते.  हिनायन पंथ बुद्धांच्या मूळ शिकवणीचे पालन करतो.  आत्म-शिस्त व ध्यान यांच्याद्वारे हे मोक्ष मिळवणे यावर भर देतात. महायान पंथाच्या उदयाबरोबर बौद्ध धर्मात मूर्तिपूजेला प्रारंभ झाला. त्यात बुद्धाला लोकोत्तर दैवी अंश मानून त्याच्या भक्तीला प्राधान्य देण्यात आले. त्यातून बुद्धाच्या विविध प्रतिमांची  निर्मिती  झाली. बुद्धाच्या मूर्ती निरनिराळ्या मुद्रा-प्रकारांत दिसून येतात. ध्यानस्थ मुद्रा,  भूमीस्पर्श मुद्रा, अभय मुद्रा, वितर्क मुद्रा हे त्याचे काही प्रकार.

पूर्वीच्या काळी पावसाळ्यात आश्रय घेण्यासाठी बौद्ध भिक्खू तसेच व्यापारी वर्ग लेण्यांचा उपयोग करत असत. ‘वर्षावास’ म्हणून  सुद्धा या लेण्या वापरल्या जात होत्या. या लेण्यांंमध्ये त्या काळात प्रचलित असलेल्या  ब्राह्मी लिपीमध्ये, व प्राकृत आणि संस्कृत भाषांमध्ये शिलालेख आढळून येतात. ते मुख्यत: दानलेख या स्वरूपाचे आहेत.

जेवणासाठी/शिक्षणासाठी सभागृह



या लेण्यांमध्ये विहार आणि चैत्यगृह हे दोन मुख्य प्रकार असतात. तसेच पाणपोई, मंडप या सारख्या सोयी असतात. विहार म्हणजेच जिथे राहण्याची व्यवस्था असते अशी जागा. हीनयान पंथाच्या उपासकांनी इसवी सन दुसऱ्या शतकात डोंगर खोदून विहार आणि चैत्य निर्माण करण्यास सुरुवात केली. या काळानंतरच भारतात पुण्याजवळ भाजे, कोंडाणे, कार्ले तसेच जुन्नर, बेडसे, अजिंठा, नाशिक अशा ठिकाणी चैत्यगृहे व विहारांची निर्मिती झाली.

भाजे चैत्यगृह



विहार बांधताना त्यामध्ये मोठा दिवाणखाना, काही ठिकाणी शयनगृह तसेच आश्रितांसाठी निवासव्यवस्था या सुविधा असायच्या. चैत्यगृह हे सर्वांसाठी प्रार्थनागृह म्हणून बांधलेले असे.चैत्यगृहामध्ये स्तूप असतो. स्तूप म्हणजेच, महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, जमिनीत पुरून त्यावर दगड व मातीचा ढिगारा रचला जायचा. मृताचे स्मारक म्हणून  घुमटाच्या आकारचे शिल्प तयार केले जायचे. वेदिका, अंड, हर्मिका आणि छत्रावली अशा रचनेमध्ये हे स्तूप शक्यतो बांधले जात. काही ठिकाणी निर्वाणवीथी ( स्मशानगुफा सुद्धा) पहायला मिळतात. भाजे, कान्हेरी या काही नमूद करण्यासारख्या  जागा. वेरुळ ( गुफा क्र.05) व कान्हेरी ( क्र. ११)  या लेण्या शैक्षणिक केंद्र असल्याचे ही समजले जाते.

निर्वाणवीथी



कालौघात या लेण्यांच्या रचनेत अनेक बदल झाले; या मधूनच मंदिरे यासंकल्पनेचा उदय झाला व मंदिरे अस्तित्वात आली.बुद्ध धर्माचा प्रभावअसलेल्या ‘ब्राह्मणीकल लेण्या’ ही बांधल्या गेल्या.त्याची सुरुवात साधारणइसवी सन पाचव्या शतकापासून झाली असावी असे संशोधन सांगते.त्याविषयी वाचूया पुढच्या भागात…

माहिती संकलन व सर्व छायाचित्रे: ऐश्वर्या देवस्थळी

शब्दांकन : स्वाती भट

जुन्नर येथील शिलालेख

ऐतिहासिक ‘महाराष्ट्र’

१ मे ,१९६० रोजी भाषेच्या आधारावर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यासाठी झालेला लढा आपल्याला माहित आहेच. परंतु महाराष्ट्र राज्याचा इतिहास किती मागे जातो,याचा विचार करायचा म्हटले तर सर्वसाधारणपणे आपल्या समोर शिवाजी महाराज, पेशवे हे सगळं डोळ्यासमोर उभे राहाते. त्या आधी इथे होऊन गेलेल्या साम्राज्यांची तितकीशी ओळख नसते. तेच मांडण्याचा हा एक प्रयत्न…
‘महाराष्ट्र’ या नावाने प्रसिद्ध असलेले आपले राज्य खूप प्राचीन काळापासून या नावाने ओळखले जाते. अर्थात त्यावेळी त्याचा भौगोलिक विस्तार किती होता याविषयी विविध मते आहेत. प्राचीन काळात रट्ठ नावाची एक जमात येथे राहत होती. त्यांच्या पराक्रमामुळे ते ‘महारट्ठ’ (महान रट्ठ) म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत होत ‘महाराष्ट्र’ नाव झाले असावे अशी एक समजुत आहे. तसेच ‘महाराष्ट्र’ हा उल्लेख इतिहासात इसवी सन दुसऱ्या शतकापासून मिळाला आहे,असेही मानण्यात येते. इसवी सन सातव्या शतकात भारतभेटीवर आलेल्या ह्युआन श्र्वांग या चिनी मुसाफिराच्या पुस्तकात महाराष्ट्राचा संदर्भ आला आहे.हे झाले ‘महाराष्ट्र’ या नावाबद्दल.पण अश्म युग,ताम्रपाषाण युग इतक्या प्रागैतिहासिक काळात महाराष्ट्राचे अस्तित्व असल्याचे पुरातन संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांना महाराष्ट्रात अनेक पुरातन जागा मिळाल्या आहेत.
महाराष्ट्र हा ‘कणखर देशा, दगडांच्या देशा’ असाच ओळखला जातो. महाराष्ट्राच्या भूतकाळातील पहिले पान म्हणजे अश्मयुग (पाषाणयुग).अश्मयुग या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. अश्मयुग (stone age) म्हणजेच मानवाच्याविकासाचा प्रथमाध्याय होय ! या काळातील माणूस भटक्या अवस्थेत होता. नदी हीच त्याची जीवनदायिनी. नदीकाठी वास्तव्य करुन आपल्या आजुबाजुला उपलब्ध असलेल्या दगडांपासून तो हत्यारे तयार करीत असे. महाराष्ट्रातील बोरी येथे काही अश्मयुगीन हत्यारे टेफ्रा (ज्वालामुखीची राख) वर मिळाली होती. वैज्ञानिक तपासानुसार ही राख १.४ दशलक्ष वर्षांपूर्वीची असल्याने तिथे सापडलेल्या या वस्तू अश्मयुगीन काळातील असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तांबे या धातुचा शोध लागला. या कालावधीला पुरातत्त्व शास्त्रज्ञ ताम्रपाषाणयुग असे संबोधतात. महाराष्ट्रातील दायमाबाद, सावळदा, इनामगाव व अश्या अनेक ठिकाणी उत्खननात तांबे व त्याबरोबरच त्या काळात वापरली जाणारी मातीची खापरे आणि इतर काही वस्तू व वास्तु संशोधकांना मिळाल्या. याचबरोबरीने शेतीसंस्कृतीचा उदय ही महाराष्ट्रात झाला होता. मुळातच अनेक नद्यांमुळे ही भूमी सुपीक आहे. त्यामुळे इथल्या नद्यांच्या प्रदेशात हा माणूस शेतीसाठी स्थिरावला.पुढे ‘लोखंड’ या धातूशी मानवाची ओळख झाली. साधारणतः हा काळ इ.स. पूर्व १२०० पासून सुरु झाला असं म्हणतात. ‘लोह’ हा माणसाच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा असा शोध ठरला. महाराष्ट्रातील विदर्भ भागात जमीनी खाली लोखंडाची काही हत्यारे, व इतर वस्तू संशोधकांना सापडल्या. त्याच बरोबर नायकुंड ह्या नागपुर जवळ असलेल्या गावात लोखंडाची काही हत्यारे व चिकणमातीपासून बनवलेली लोह भट्टी मिळाली.त्याचबरोबर संशोधकांना ‘megalithic burial ‘ (प्राचीन काळी काही जमातींमध्ये माणूस मृत्यू पावल्यावर त्याला ज्या जागी पुरले जायचे तेथे मोठे मोठेदगड रचून ठेवले जायचे) चे काही अवशेष ही मिळाले. त्याच प्रमाणे माहुर्झरी, जूनापाणी,इत्यादी ठिकाणी बरेच महत्त्वाचे शोध लागले.

हिरापूर येथील Megalithic Burial

यानंतर उदयास आला तो ऐतिहासिक काळ. या काळात लिखाण अस्तित्त्वात आले. विविध साहित्य लिहिले गेले.त्यामुळे या काळाला पुरातत्त्व संशोधनात वेगळे महत्त्व आहे. हा काळ म्हणजेच बुद्ध आणि महावीर यांचा काळ. इसवी सन पूर्व ६०० पासून या काळाची सुरुवात झाली असावी असे मानण्यात येते. याच काळात विविध साम्राज्य अस्तित्वात आली.ज्यावेळी भारतभर विविध प्रदेशात अनेक राजे राज्य करत होते त्यावेळी महाराष्ट्रात सुद्धा शक्तिशाली साम्राज्ये निर्माण झाली. व्यापारी केंद्राचे मुख्य ठिकाण ‘शुर्पारक’ (आताचे नालासोपारा), येथे इ. स. पुर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाने धर्मप्रचारासाठी मौर्य ब्राम्ही लिपीत लिहिलेला शिलालेख प्रसिद्ध आहे. या ऐतिहासिक काळात अनेक राजवटींनी या प्रदेशावर आपली सत्ता गाजवली. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन पहिले यामध्ये सातवाहन साम्राज्य महाराष्ट्रात प्रबळ होते. प्रतिष्ठान (आताचे पैठण) हे त्यांचे राजधानीचे ठिकाण होते. या कालखंडात कार्ले, भाजे, कान्हेरी, बेडसे या सगळ्यात प्राचीन समजल्या जाणाऱ्या बौद्ध गुंफा कोरल्या गेल्या.याच साम्राज्यातील राजा श्री सातकर्णी ह्याची राणी नागणिका हिने अखंड भींतीवर कोरलेला शिलालेख हा एक महत्वाचा ऐतिहासिक दुवा संशोधकांना नाणेघाट येथे सापडला आहे. त्यावरून त्या काळातील सातवाहन राजे, देव ,व्रते ,दानधर्म आणि समाजातील धार्मिक बाबींचा उलगडा झाला. याच लेणीत एक प्रतिमागृह असल्याचे ही कळते व त्या भग्न प्रतिमांखाली राजांची नावे देखील कोरलेली आहेत. गौतमीपुत्र सातकर्णी हा या घराण्यातील महान राजा होऊन गेला. एका शिलालेखात ‘त्रि समुद्र तोय पित वाहना’ ( ज्याचा घोडा तीन समुद्राचे पाणी प्यायला आहे ) असा उल्लेख या राजाबद्दल केला आहे.या वरूनच सातवाहनांचा प्रभाव दिसून येतो.

नागाणिका राणीचा भिंतीवरील शिलालेख
बेडसे चैत्यगृह

इसवी सन २५० – ५०५ दरम्यान वाकाटक राजवटीने राज्य केले. विदर्भातील नगरधन ( पूर्वीचे नंदीवर्धन) ही यांची राजधानी असल्याचे पुरावे सांगतात आणि येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन ही झाले. मन्सर, रामटेक, वाशीम, पौनार, मांढळ, कौदिन्यपूर ही या राजवटीची काही महत्वाची स्थाने होती.त्याचवेळी उत्तरेस गुप्त घराणे हे सुद्धा प्रभावशाली होते.राजा चंद्रगुप्त दुसरा, याची कन्या प्रभावतीगुप्त ही वाकाटक घराण्याची सून झाली आणि ह्या दोन राजवटींचे एकमेकांशी संबंध जोडले गेले. या संबंधातून गुप्त घराण्याच्या धार्मिक विचारांचा वाकाटकांवर पगडा दिसून आला. राणी प्रभावती हिच्या शिलालेखांतून हे दिसून येते. शिवभक्त असणाऱ्या वाकाटकांनी पुढील काळात नरसिंह,वराह यांची मंदिरे बांधली.
स्थापत्यकलेच्या जडणघडणीत हा एक महत्वाचा काळ मानण्यात येतो. वाकाटक घराण्यातील हरिशेन राजा याच्या काळात अजिंठा लेणीचे काम जोमाने सुरु झाले.अनेक प्राचीन हिंदू मंदिराचे बांधकाम या काळातील असल्याचे दिसून येते.

याशिवाय अनेक महत्वाच्या राजघराण्यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाटा होता. चालुक्य, राष्ट्रकूट,कलचुरी,शिलाहार, यादव यांचा समृद्ध काळ महाराष्ट्राने अनुभवला. घारापुरी (एलिफंटा)लेणी, अंबरनाथ शिवालय, कोपेश्वर, देवगिरी अशी अनेक स्थाने या समृद्धीची प्रतीके म्हणून ओळखली जातात.याशिवाय महाराष्ट्र प्रदेशाबाहेरील मौर्य ,गुप्त, मुघल राजवटीसारख्या अनेक राजवटींचा प्रभावही इथे दिसून आला.त्यानंतर मग आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा मराठे आणि पेशवे यांचा काळ सुरु झाला.
एकूणच महाराष्ट्राचा ऐतिहासिक कालखंड विविधप्रकारे भारत आणि जगाच्या इतिहासाचा अभ्यास करताना मोलाची भूमिका बजावतो.

वेरुळ येथील कैलाश मंदिराचे शिखर

माहिती संकलन आणि सर्व छायाचित्रे : ऐश्वर्या देवस्थळी
शब्दांकन : स्वाती भट

भारतातील पुरातत्त्व संशोधनाचा प्रवास..

पुरातत्त्व म्हणजे नक्की काय व त्याचा अभ्यास कसा असतो हे आपण गेल्या भागात वाचले. पण हे पुरातत्त्व संशोधन सुरू कधी झाले? विशेषतः भारतात त्याचा उगम कसा झाला हे वाचूया या भागात.

पुरातत्त्व संशोधन भारतात कधीपासून सुरू झाले याचा विचार करत असताना आपल्याला मुख्यतः तीन कालखंड लक्षात घ्यावे लागतात.एक ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी,दुसरा ब्रिटीश साम्राज्य असताना आणि तिसरा स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत. ज्या मुलखावर राज्य करायचे त्याची संपन्न संस्कृती आणि इतिहास माहित असेल तर कारभार करणे सोप्पे होईल हा उद्देश पहिल्या दोन्ही कालखंडात होता.
भारतात ब्रिटिश राजवट सुरू होण्याआधी जे राजे होऊन गेले त्यांनी ऐतिहासिक साहित्य, दस्तऐवज, वास्तू यामध्ये रस दाखवला होता. अकबर आणि समकालीन राजांनी रामायण, महाभारत अशा प्राचीन ग्रंथाचा अभ्यास केला होता आणि तसेच या ग्रंथांची विविध भाषांतरे करून वेगवेगळ्या देशांत प्रसिध्द केली.
या कालखंडात त्याला संशोधनाचे स्वरूप आले नव्हते. तर ते केवळ आवड व उत्सुकता म्हणून केले जात होते. परंतु एक संशोधनाची शाखा म्हणून ‘पुरातत्त्व’ अभ्यास ब्रिटिशांनी भारतात आणला. सुरुवातीला लागलेले काही शोध हे अचानकपणे लागलेले होते. त्यामध्ये ठराविक उद्दिष्ट ठेउन शोध सुरू केला नव्हता. बांधकामे सुरू असताना, रस्ते खणताना काही नाणी, प्राचीन वस्तू सापडल्या. त्यानंतर प्राचीन साहित्यावर अभ्यास सुरू झाला. पौराणिक कथा आणि त्यात असलेले संदर्भ यावर संशोधन सुरू झाले.हस्तिनापूर, अवंती, कोसंबी,पाटलीपुत्र वगैरे शहरांचा कथांमधील उल्लेख आल्याने ही शहरे शोधण्याच्या उद्देशाने पुढे अभ्यास सुरू होता. त्या दरम्यान कलकत्ता येथे १७८४ साली ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ची स्थापना झाली. ब्रिटिश ज्युरी आणि संस्कृत पंडित विल्यम जॉन्स यांनी या संस्थेची स्थापना केली.ही संस्था भारतीय संस्कृती आणि इतिहास यांच्या अभ्यासाचे केंद्र बनले. तिथूनच पुढे पुरातन संशोधनाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.अलेक्झांडर कन्निंग्हम यासारखे ब्रिटिश आर्किओलॉजिस्ट आणि त्याचबरोबर काही भारतीय अभ्यासक यांचा या संशोधनात महत्वाचा वाटा होता.हसमुख धीरजलाल सांकलिया हे संस्कृत विद्वान आणि आर्किओलॉजिस्ट यांचे भारतातील पुरातत्त्व संशोधन कार्यात महत्वाचे मोलाचे योगदान होते.त्यांनी प्रोटो आणि प्राचीन भारतातील कालखंडाबाबत संशोधन केले होते.तसेच पुढील काळात पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये आर्किओलॉजीचे रीतसर अभ्यासक्रम सुरु करण्यात अग्रेसर होते.
१८६१ साली ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या सरकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून पुरातत्त्व संशोधन आणि अभ्यास यावर ही संस्था आजतागायत काम करत आहे.
विविध ठिकाणी सुरू असलेल्या अभ्यासामध्ये भारताचा इतिहास अश्मयुगीन काळापर्यंत मागे जातो याचा शोध लागला. त्या काळात वापरात असलेली दगडांची हत्यारे अशाच एका उत्खननात ब्रिटिश आर्किओलॉजिस्ट रॉबर्ट ब्रूस फूट यांना मद्रास जवळ पल्लवरम येथे १८६३ साली सापडली. त्यामुळे त्यांना “फादर ऑफ इंडियन प्री-हिस्टरी” या विशेषणाने ओळखले जाते.
भारतीय इतिहास हा साधारण १.४ दशलक्ष वर्षे किंवा त्यापेक्षाही जुना आहे याचे पुरावे एका संशोधनातून समोर आले. महाराष्ट्रातील बोरी येथे काही अश्मयुगीन हत्यारे ज्वालामुखीच्या राखेच्या थरावर मिळाली होती. वैज्ञानिक संशोधनातून या टेफ्राचा काळ शोधण्यात आला. तो काळ १.४ दशलक्ष वर्षांपूर्वीचा असल्याने त्यात सापडलेल्या वस्तू अश्मयुगीन काळातील असल्याचे सिद्ध झाले. अनेक ठिकाणी उत्खनन चालू होतेच. तसेच पहिली नागरी संस्कृती म्हणून ओळखल्या जात असलेल्या सिंधू संस्कृतीवर शोध स्वातंत्र्य पूर्व काळापासून शोध चालु होताच. स्वातंत्र्य मिळाल्यावर फाळणी नंतर सगळ्या साइट्स सध्याच्या पाकिस्तानात गेल्या.त्यामुळे भारताने नव्याने सिंधू संस्कृती शोध मोहिम सुरु केली आणि स्वतंत्र भारतातील सिंधू संस्कृतीवर प्रकाश पडला.
कोणत्याही संस्कृतीबाबत जाणून घ्यायचे असेल तर तेथील प्रचलित भाषा व लिखित माहिती समजुन घेणे सगळयात महत्वाचे ठरते. प्राचीन भारतात ब्राह्मी, खारोश्ती ह्या लिपी कारभारासाठी वापरल्या जात होत्या. अशाच संशोधनात अनेक शिलालेख मिळाले. तेव्हा ही लीपी सोडवण्याचे प्रयत्न सुरु झाले. ब्रिटिश आर्किओलॉजिस्ट जेम्स प्रिन्सेप यांनी १८३७ साली पहिल्यांदा ही लीपी सोडवली होतीच. त्यामुळे पुढील संशोधनास नवीन दिशा मिळाली आणि अनेक विद्वान लोकांनी त्यांचे शोध पुढे आणून प्राच्य ज्ञानात महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात पुरातत्त्व संशोधनासाठी ही महत्वाची कामगिरी बजावत आहे. आजपर्यत सिंधू संस्कृतीच्या अनेक साइट्स सध्याच्या भारतात राजस्थान ,गुजरात,पंजाब,हरियाणा इत्यादी ठिकाणी मिळाल्या आहेत.प्राचीन भारताविषयी अजूनही खूप संशोधन या संस्थेमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहे.आतापर्यंत झालेल्या अशाच संशोधनांविषयी आपण पुढील काही भागात अधिक जाणून घेऊया.

संकलन -ऐश्वर्या देवस्थळी
शब्दांकन- स्वाती भट

पुरातत्त्व म्हणजे काय??

आठवणींमध्ये रमायला कोणाला आवडत नाही ? किंवा आपल्या आधी घडलेल्या घटना ऐकताना आपण रमतोच! थोडक्यात काय तर आपल्या पूर्वीचा इतिहास हा नेहमीच माणसाच्या कुतूहलाचा भाग राहिला आहे.नदीचे मूळ आणि ऋषींचे कूळ शोधू नये असे म्हंटले जाते.परंतु हे शोधायचा प्रयत्नच नाही केला तर माणसाला सिंधू नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीचा शोध कसा लागला असता? सिंधू संस्कृतीतल्या माणसांविषयी कसे कळले असते? अगदी पृथ्वीचा उगम कसा झाला, इथपासून ते आता काही शतकांपूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या साम्राज्यांविषयी अनेक गोष्टींचा उलगडा होण्यामागे मूळ कारण होते ते माणसाचे कुतूहल. ह्या कुतूहलातूनच संशोधन सुरू झाले आणि पुरातत्व या शाखेचा उदय झाला. पुरातत्त्वाचा अर्थच पुरातन तत्त्व. अर्थात प्राचीन तत्त्व. मग हे तत्त्व काही केवळ मानवी प्रजातीचंच असेल असे नाही तर अगदी प्राणी, वनस्पती अशा सजीव घटकांपासून ते पूर्वीच्या काळी वापरली जाणारी भांडी ,नाणी,अशा अनेक निर्जीव गोष्टींचा यात समावेश होतो. राजे -राजवाडे, कला ,संस्कृती, साहित्य यांनी आपला पूर्वकाल समृद्ध आहे. या सगळ्यांचे संशोधन म्हणजे पुरातत्त्व संशोधन म्हणता येईल.

लिखित इतिहास आणि पुरातत्त्व संशोधन यामध्ये नक्की काय फरक याविषयी एक संभ्रम सर्वसामान्य जनांच्या मनात कायम असतो. आपण शाळेत किंवा अन्य पुस्तकात वाचतो तो इतिहास अशी आपली समजूत असते.परंतु खरं म्हणजे लिखित आणि पुरातत्व संशोधन हे दोन्ही एकमेकांना पूरक ठरतात.

काही बखरी,दस्तावेज,शिलालेख यांच्या संदर्भावरून पुरातत्व संशोधक अभ्यास करत असतात त्याचवेळी त्यांनी केलेले संशोधन लिखित स्वरूपात आपल्याला पुस्तकांनातुन वाचायला मिळते. तेच आपण इतिहास म्हणून वाचत असतो. पुरातत्त्व संशोधनात मानवी इतिहासापासून ते भाषा, संस्कृती, साहित्य, कला, विज्ञान, समाजशासत्र अशा अनेेक विषयांचा अभ्यास सामावलेला असताे. असे संशोधन करताना फार वेगवेगळे अनुभव येत असतात. एक अभ्यासक म्हणून या प्राचीन तत्त्वाचा अभ्यास करताना या वास्तूंविषयी,वस्तूंविषयी एक आगळा दृष्टिकोनच सापडतो.तोच मांडण्याचा प्रयत्न पुढच्या लेखमालेत असेल…क्रमशः


संकलन -ऐश्वर्या देवस्थळी

शब्दांकन- स्वाती भट

Design a site like this with WordPress.com
Get started